गाडीतून देशी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतूस जप्त; एक आरोपी अटकेत

0
165

तुमसर :- पोलीस स्टेशन तुमसर हद्दीत गोंदिया रोडवरील खापा चौकाजवळ अवैधरित्या शस्त्र (weapon) बाळगणार्‍या दोन व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे. दि.२७ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री २.१६ ते ३ वाजतादरम्यान शेवरोलेट कंपनीच्या टवेरा एमएच ४० एआर २१६२ या गाडीतून आरोपी शस्त्र बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रविन सयाम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.

तपासणी दरम्यान, देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (cartridges) आढळून आली. पोलिसांनी सुमित संजय सोनवाने (२९) रा.पवनी, ता.रामटेक, जि.नागपूर याला अटक केली असून शैलेश कडबे (३५) रा.बोथीया पालोरा, ता.रामटेक, जि.नागपूर, हा फरार आहे. या कारवाईत एकूण ४, ३१, ००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यात देशी कट्टा ३०,००० रुपये, दोन जिवंत काडतुसे १,००० रुपये, टवेरा गाडी ४,००,००० रुपये समावेश आहे. या प्रकरणी आरोपींवर कलम ३/२५, २७ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा (crime) नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपी हे आयपिएल सट्टा बाजार प्रकरणी तुमसर व खापा येथील एका खानावळीत आले होते. अशा चर्चा नागरिकांत रंगल्या आहेत आणी यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दिशेने पोलीसांनी तपासाला गती देण्याची गरज आहे.

प्राथमिक तपासात वाहनातून नेणारे देशी कट्टा विक्रीकरीता तर नेत नव्हते ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध शस्त्र विक्री करणे व पुरवठा करणे यांच्याशी कनेक्शन आहे काय, या दिशेने सुद्धा पोलीस तपास करीत आहेत. तुमसर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पाहिजे त्या प्रमाणात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. पोलीस नावाचा धसका गुन्हेगारात नसल्याने तुमसर शहर व परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली असून फरार आरोपीच्या मागावर पोलीस असून विश्वसनीय पोलीस सूत्रांकडून फरार झालेल्या आरोपीला गिरड परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.