गोंदिया : गुन्हेगारीवर वचक बसावा, याकरीता पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. शहर पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या गंभीर गुन्ह्यात सक्रिय सहभाग असलेला अट्टल गुंडाला एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. यासीन सलीम शेख (३२) रा.पंचायत समिती कॉलनी, गोंदिया (Gondia District Police) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीची वर्षभरासाठी अकोला कारागृहात स्थानबध्दतेसाठी रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीला लगाम बसावा, यासाठी पोलिस विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सतत कारवाई होत असताना गुन्हेगारांच्या वागणुकीत चरित्रात कोणताही बदल किंवा सुधारणा झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता वारंवार निर्माण होत असते. त्यातच आगामी सण व उत्सव शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावे, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरीता गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर हद्दपार व स्थानबध्दतेची कारवाई केली जात आहे. यानुसार शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर पर्वते यांनी पंचायत समिती येथील राहणारा धोकादायक गुंड यासीन उर्फ यासीम उर्फ बाबू वलद समीम उर्फ सलीम शेख (३२) याचेविरुद्ध एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव एसडीपीओ श्रीमती रोहिणी बानकर, तिरोडाचे एसडीपीओ साहिल झरकर यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांना प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या शिफारसीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून सराईत धोकादायक गुंडाविरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई प्रस्तावित करून २८ मार्च रोजी आदेश देवून स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला. यानुसार शहर पोलिसांच्या वतीने आरोपी यासीन सलीम शेख याला ४ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह अकोला येथे एका वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शहरपोलिस ठाणे हद्दीतील यासीन सलीम शेख (३२) याच्यावर जिल्हाधिकार्याच्या आदेशान्वये एमपीडीए अंतर्गत (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. या आरोपीवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, खून करणे, चाकूचा धाक दाखवणे, मारहाण करणे, गैर कायद्याची मंडळी जमा करून मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न करणे, लोकांमध्ये दहशत पसरविणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणे आदि गुन्ह्याची पोलिस ठाण्यामध्ये नोंद आहे. त्याच्या अवैध कृतीमुळे जनसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.