**पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाशिम, दि. ६ एप्रिल : बंजारा समाजाचा इतिहास शौर्य, पराक्रम व त्यागाचा आहे. बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने नंगाराभवन, संस्कृती परंपरेचे दर्शन घडविणारे संग्रहालय अशी अनेक कामे पूर्ण केली. येथील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
श्रीराम नवमी आणि संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा बंजारा काशी पोहरादेवी येथे झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज,
उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सईताई डहाके, संजय कुटे, राजेश राठोड, तुषार राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रभू श्री रामचंद्राने सर्व घटकांना एकत्र करत समता, एकता, न्यायप्रियता आदी मूल्य व्यवस्था असलेले आदर्श रामराज्य निर्माण केले. संत सेवालाल महाराज यांनी हा आदर्श अनुसरत प्रत्येकात राम जागविण्याचा प्रयत्न केला. बंजारा समाज प्राचीन समाज असून, ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आढळतो. या समाजाचे देशातील प्राचीन काळापासून व्यापार, वाहतूक क्षेत्र समृद्ध करण्याबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे संत सेवालाल महाराज तांडा सुधारणा समिती, तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा यासह अनेक निर्णय, तसेच नवीन योजना व उपक्रम हाती घेतले आहेत. पोहरा देवी या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली जातील.
मंत्री श्री. महाजन, राज्यमंत्री श्री. नाईक व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम तसेच आरती झाली.यावेळी मंत्री श्री. महाजन, श्री. राठोड यांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले, तसेच संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.