25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता हैद्राबाद-रायपूर खासगी बसची ट्रकला धडक,प्रवासी जखमी

हैद्राबाद-रायपूर खासगी बसची ट्रकला धडक,प्रवासी जखमी

0
341

गोंदिया,दि.२७ः-हैदराबाद वरून रायपूरकडे प्रवाश्यांना घेऊन जात असलेल्या खासगी बसच्या चालकाचा ट्रकला ओव्हर टेक करताना बस वरून नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना आज, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१० वाजताच्या सुमारास कोहमारा-नवेगावबांध मार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमीत एका सहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. सर्व जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.प्रत्यक्षदर्शींच्या मते पुष्पराज ट्रॅव्हल्स कंपनीची सीजी ०८ बीबी ३७२० क्रमांकाची खासगी बस प्रवाशांना घेऊन हैदराबाद वरून रायपूरकडे जात होती. यावेळी बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, कोहमारा-नवेगावबांध मार्गावर चिखली गावाजवळ बस चालकाने समोरील ट्रकला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बस चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटला. त्यामुळे भरधाव बसची ट्रकच्या मागील भागात जोरदार धडक बसली, ज्यामध्ये बसमधील सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले. यात एका सहा महिन्याच्या चिमूकलीच्या डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत डूग्गीपार पोलिसांना याबाबत माहिती दिली. सर्व जखमी प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतून सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सर्व जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील जखमींची नावे कळू शकली नाहीत. डूग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाईला सुरुवात केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.