अहेरी :रविवार १८ जानेवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ इसमाचा सोमवारी १९ जानेवारी रोजी सकाळी जंगल परिसरात मृतदेह आढळल्याचे एकच खळबळ उडाली आहे. शरीरावरील भयानक घाव पाहता क्रूर हत्येचा संशय व्यक्त होत आहे. रवींद्र तंगडपल्लेवार (३९) रा. नागेपल्ली ता. अहेरी असे मृतकाचे नाव आहे.
रवींद्र तंगडपल्लीवार हा आर. डी.जमा करण्याचे काम करतो. कामानिमित्त प्रगती बँकेत जाणार असल्याचे सांगून तो रविवारी दुपरी घराबाहेर पडला. लवकरच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. घरच्यांनी व मित्र मंडळाने संपूर्ण संघ्याकाळपर्यंंत शोध घेतला. पण काहीच हाती लागले नाही. आज सोमवारी सकाळी अलापल्ली ते सिरोंचा (एन एच३५३ सी )मार्र्गावर पुन्हा शोध मोहीम चालू असताना, नागमाता मंदिराजवळील जंगलात राष्ट्रीय महामार्गापासून २०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.
आलापल्ली पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत क्रूरपणे केलेले घाव, एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मृतदेहा जवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटली आढळली. रवींद्र तंगडपल्लेवार याच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे . घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे , पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्याची चमू दाखल झाली. पुढील तपास सुरू आहे





