नागपूर,दि.२०- राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी व बनावट शालेय शिक्षक घोटाळा प्रकरणात सदर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील मुख्याध्यापकासह शिक्षकांना अटक केली.मुख्याध्यापक भाऊराव मधुकर मालचे (वय ५६), शिक्षकद्वय दिनेशकुमार छबीलाल कटरे (वय ४४) व रूपाली बिहारीलाल रहांगडाले (वय ४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघेही गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील मिलिंद मागासवर्गीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित सिद्धार्थ हायस्कूल अँड आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत आहेत. बनावट दस्तऐवजाद्वारे नोकरी मिळवून त्यानंतर याच दस्तऐवजाचा वापर करीत शालार्थ आयडी तयार करण्यात आली. एप्रिल २०२४मध्ये या घोटाळा प्रकरणात सदर पोलिसांनी फसवणुकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वातील एसआयटी तर बनावट शालेय शिक्षक घोटाळ्याचा तपास सदर पोलिस करीत आहेत. या घोटाळ्यात मालचे, कटरे व रहांगडाले हेही लाभार्थी आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सदर पोलिस ठाणे, अमोल देशमुख, उपनिरीक्षक संतोष शिरडोळे, हेडकॉन्स्टेबल प्रलेश कापसे, सुनील राऊत यांनी तिघांना अटक केली. त्यांची दोन दिवस पोलिस कोठडी घेतली. शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पराग नानाजी पुडके, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षक मुख्याध्यापकांसह १७ पेक्षा अधिक जणांना अटक केली. पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.





