30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home गुन्हेवार्ता जंगलात लपवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा हस्तगत!

जंगलात लपवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा हस्तगत!

0
372
गोंदिया पोलिसांची धडक कारवाई
गोंदिया-नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सन 2005 पासून राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठे यश मिळाले आहे. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात तब्बल 14 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांच्या दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जंगलात लपवलेला प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत करून नक्षल चळवळीला मोठा धक्का दिला आहे.
  माओवाद्यांच्या एमएमसी झोनचा प्रवक्ता व एसझेडसीएम पदावर असलेला अनंत ऊर्फ विकास नवज्योत नागपुरे याने 28 नोव्हेंबर 2025 रोजी त्याच्या 10 साथीदारांसह, तसेच दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर रोशन वेडजा याने 13 डिसेंबर 2025 रोजी 2 साथीदारांसह आत्मसमर्पण केले होते. जीआरबी डिव्हिजन अंतर्गत दरेकसा एरिया कमिटीतील तब्बल 14 माओवाद्यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दलासमोर शरणागती पत्करली होती. आत्मसमर्पित माओवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे 25 जानेवारी 2026 रोजी गोंदिया पोलिस दलाने मुरकूटडोह बेस कॅम्प अंतर्गत टाकेझरी-बेवारटोला डॅम परिसरातील जंगलात विशेष शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी भूमिगत करून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटकांचा मोठा डम्प यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पित माओवाद्यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या माहितीच्या आधारे विविध जंगल परिसरात सतत शोध मोहिमा राबविण्यात येत आहेत. आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 माओवाद्याच्या डम्पमधून एक एके-47 रायफल, दोन एसएलआर रायफल, एक कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल, एक 12 बोअर रायफल, एक क्लेमोर माईन, तीन एक एके-47 मॅग्झीन, नऊ एसएलआर मॅग्झीन, एक इंसास मॅग्झीन, एसएलआर राऊंड 187, एके 47 राऊंड 58, इंसास राऊंड 15, रायफल राऊंड 35 नग, 8 एमएम राऊंड 12, कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल 45 राऊंड 14 नग, बीजीएल 4, सुरका शेल्स 10, सुरका लाँचर राऊंड 10, स्फोटक पदार्थ अंदाजे 8.5 किलो, डेटोनेटर, कॉर्डेक्स वायर, वॉकीटॉकी, सोलर प्लेट, बॅटर्‍या, कलर प्रिंटर व इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मोठ्या घातपाती कटाला आळा
या शस्त्रसाठ्याच्या हस्तगततेमुळे मोठ्या घातपाती कारवायांना वेळेत आळा बसला असून, जिल्ह्यातील नक्षल नेटवर्कला जबर धक्का बसला आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सुरक्षा यंत्रणेतून कौतुक होत आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात कारवाई
ही कारवाई गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक प्रमोद भातनाते, सहायक पोलिस निरिक्षक संजय नाईक, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलिस हवालदार लक्ष्मण घरत, मुस्ताक सैय्यद, पोलिस शिपाई रमेश उईके, राजेश तावाडे, नक्षल सेल गोंदिया तसेच सी-60 झोडे पथकाने यशस्वी धडक कारवाई केली.

blank