29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदिया-कारंजा मार्गावर खासगी बसला अपघात १ठार,९ जखमी

गोंदिया-कारंजा मार्गावर खासगी बसला अपघात १ठार,९ जखमी

0
286

गोंदिया: लग्नाचा सोहळा आटोपून आनंदाने घरी परतणार्‍या वर्‍हाड्यांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मध्यप्रदेशातील खैरलांजी येथून लग्न आटोपून गोंदियाकडे परतणार्‍या एका खाजगी बसला कारंजा परिसरात गुरुवारी (१२ मार्च) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या काळजाचा थरकाप उडवणार्‍या अपघातात नागपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा-मोहाठी येथील वरखडे कुटुंबातील मुलाचे लग्न मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी (महकेपार) येथे होते. या विवाह सोहळ्यासाठी बुधवारी (११ मार्च) दुपारी वरात वाजत-गाजत खैरलांजीला गेली होती. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत लग्नाचे विधी पार पडल्यानंतर, पहाटेच्या सुमारास सर्व वर्‍हाडी एका खाजगी बसने परत येण्यासाठी निघाले. बसमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेक नातेवाईक होते. पहाटेची वेळ असल्याने आणि प्रवासाचा थकवा असल्याने बहुतांश प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत होते.

६ वर्‍हाडी गंभीर जखमी

दरम्यान, पहाटे ५ वाजेच्या सुमारास बस कारंजा परिसरात पोहोचली असता, चालकाने समोर असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचा वेग प्रचंड असल्याने चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली बस समोरील वाहनाला घासून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीत शिरली. वेग जास्त असल्याने बसने रस्त्यालगतची अनेक झाडे मोडीत काढली, ज्यामुळे बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि काचा फुटून प्रवाशांच्या अंगावर आल्या. अचानक झालेल्या या मोठ्या धडकेमुळे बसमध्ये एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला.

या भीषण दुर्घटनेत सोनू घनश्याम उईके (वय २७, राहणार वाडी, नागपूर) या तरुणाचा जागीच करुण अंत झाला. तर लक्ष्मी घनश्याम उईके (५८, रा. वाडी, नागपूर), नैतिक श्याम सीडाम (१४, रा. कोहमारा), हेमराज श्रवण चव्हाण (५३, रा. कवळीटोला, गोरेगाव) आणि शोभा उदेलाल पंधरे (७०, रा. कोहमारा, सडक अर्जुनी) यांच्यासह अन्य काही जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच कारंजा परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. काही प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर पडून इतरांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने गोंदिया येथील केटीएस जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

दुसरीकडे, अपघात घडताच बस चालकाने जबाबदारी झटकून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बस झाडांमध्ये अशा प्रकारे अडकली होती की ती बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे चोपा-मोहाठी गावावर आणि वरखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.