आमगाव : तालुक्यात १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास आमगाव–गोंदिया मार्गावर एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित चारचाकी वाहन चालक हा एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला असून, राजकीय दबावातून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झांजीया मोहगाव येथील बावनकर कुटुंबातील चैतराम मंगरू बावनकर आणि तुकाराम बावनकर हे दोघे लग्नपत्रिका वाटपासाठी दुचाकीने निघाले असताना भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमींच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अपघात घडविणारा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच राजकीय पदाचा प्रभाव वापरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊ दिला नाही आणि रुग्णालयातील कायदेशीर प्रक्रिया देखील थांबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली असून, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीवर हिट अँड रन, निष्काळजी वाहनचालक, पुरावे नष्ट करणे आणि राजकीय दबाव टाकणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काही समाजसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. आमगावातील या घटनेमुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





