दौंड,दि.२९ः तालुक्यातील कासुर्डी येथील आखाडे वस्तीवर वैद्यकीय पदवी व आवश्यक परवाने नसताना अनेक वर्षांपासून डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकर (रा. सदर बाजार, जि. भिलवाडा, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष शंकर शिरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा वैध प्रमाणपत्र नसताना तो स्वतःला डॉक्टर म्हणून नागरिकांवर उपचार करत होता. तसेच औषध विक्रीचा परवाना नसतानाही विविध औषधांचा साठा ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे तपासात उघड झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून नामांकित कंपन्यांची औषधे, गोळ्या, होंडा सिटी चारचाकी वाहन, रोख रक्कम असा एकूण सुमारे ६ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.





