31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home गुन्हेवार्ता अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू

अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू

0
9

( गडकुंभली-साकोली येथील हृदयद्रावक घटना;) पिंपळगाव-खांबी परिसरात शोककळा
अर्जुनी-मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे)-तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथील बारावीचा विद्यार्थी मयुर युवराज ब्राम्हणकर याचा गडकुंभली, साकोली येथील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज, ता. १७ सप्टेंबर रोजी घडली. ऐन शैक्षणिक वाटचालीच्या उंबरठ्यावर असलेल्या मयुरच्या अकाली निधनाने पिंपळगाव-खांबीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव-खांबी येथील एका नागरिकाच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मयुर ब्राम्हणकर हा गडकुंभली, साकोली येथील डोहावर गेला होता. अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना डोहातील पाणी पाहून मयुर पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र, डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला.
मयुर पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या नागरिकांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर मयुरचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला.
या घटनेने मयुरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याचे मित्र, शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बारावीच्या शिक्षणासह उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या मयुरचा अशा प्रकारे अकाली अंत झाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.