31 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home महाराष्ट्र महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

0
12

नागपूर, दि. 17 सप्टेंबर 2026: महावितरणच्या प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालकपदी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा व सुनील काकडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. नवनियुक्त कार्यकारी संचालक याआधी महावितरणमध्ये मुख्य अभियंता म्हणून विविध ठिकाणी कार्यरत होते.

कार्यकारी संचालक अंकुर कावळे याआधी मुख्यालयात मुख्य अभियंता (वितरण) म्हणून कार्यरत होते. त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे. सन 1997 मध्ये सहायक अभियंता म्हणून कावळे तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये रूजू झाले. पदोन्नतींनंतर त्यांनी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर येथे विविध पदांवर काम केले आहे. सन 2025 पासून ते मुख्य अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात कार्यरत होते.

कार्यकारी संचालक. संदीप पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केली असून सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. सन 2009 मध्ये त्यांची थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. सन 2018 मध्ये अधीक्षक अभियंतापदी तर सन 2025 मध्ये त्यांची मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली. संदीप पाटील हे मुख्य अभियंता (वीज खरेदी) म्हणून मुख्यालयात कार्यरत होते.

कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतींवर त्यांनी अलिबाग, वाशी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे काम केले आहे. सन 2009 मध्ये त्यांची थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. तर सन 2018 मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून तर सन 2024 मुख्य अभियंतापदी पदोन्नतीने झाली. चंद्रमणी मिश्रा कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

कार्यकारी संचालक सुनील काकडे यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून 1997 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर विविध पदांवर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले. काकडे यांची सन 2022 मध्ये मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. भांडूप परिमंडलानंतर सन 2025 पासून सुनील काकडे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.