कत्तलीसाठी नेणाºया ८६ जनावरांसह ४ ट्रक जप्त

0
8

गडचिरोली दि.१२ ::- जिल्ह्यातून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाºया ट्रकवर पोलिसांनी कारवाई करून ८६ जनावरे व चार ट्रक असा एकूण ५३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  मात्र यातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून देसाईगंज पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनावरे वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांचे एक पथक कुरखेडा-देसाईगंज मार्गावर शनिवारी रात्री सापडा रचून होते. दरम्यान शंकरपूर फाट्याजवळ कुरखेडा मार्गाने देसाईगंजकडे काही ट्रक येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी सदर ट्रकांना थांबवून झडती घेतली असता, चारही ट्रकमध्ये जनावरांना दोरीने बांधून ठेवले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत चारही ट्रकचे चालक फरार झाले. पोलिसांनी एमएच – ३४ एव्ही १२०५, एमएच – ३४ एव्ही ०५१८, एमएच – १२ एनबी २१६१ व एमएच -०४ जीआर ०१७५ या क्रमांकाचे चारही ट्रक जप्त केले.
घटनास्थळावरून ५ लाख २२ हजारांची ८६ जनावरे तसेच ४८ लाखांचे ४ ट्रक असा एकूण ५३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेली ८६ जनावरे चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा येथील गोशाळेत पाठविण्यात आली असून फरार आरोपींचा देसाईगंज पोलीस कसून शोध घेत आहेत.