सरपंच, ग्रामसेवकासह चार जणांना अटक

0
14

भंडारा,दि.05ः- कृषी केंद्र सुरू करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व परिचराला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मांगली येथे करण्यात आली.प्रशांत भैय्याजी मासूरकर (३६) सरपंच, मेघा उद्धव झलके (३0) ग्रामसेवक, माधव अर्जुन वालदे (५२) ग्रामपंचायत सदस्य, राजकुमार उमराव वाघाडे (४४) ग्रामपंचायत परिचर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
यातील तक्र ारदार हे मांगली येथील रहिवासी असून त्यांना मांगली येथे रासायनिक खते, कीटकनाशके व बि-बियाणे विक्रीकरीता कृषी केंद्र सुरू करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून ग्रामपंचायत मांगली येथे १८ एप्रिल २0१८ रोजी अर्ज सादर केला. परंतु, त्या अर्जावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान ग्रामपंचायतचे चपराशी यांनी तक्र ारदाराच्या भावाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंचाला पाच हजार रुपये द्यावे लागतील, तेव्हाच काम होईल, असे सांगितले. तेव्हा तक्र ारदार हे सरपंच मासूरकर याला भेटले असता त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. तक्र ारदाराने याची तक्र ार भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
तक्र ारीवरून १ व २ जून रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान, सरपंच प्रशांत मासूरकर, ग्रामसेवक मेघा झलके, ग्रामपंचायत सदस्य माधव वालदे यांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून ४ जून रोजी सापळा कारवाईदरम्यान ग्रामपंचायत परिचर राजकुमार वाघाये यांच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारण्यात आल्याने चारही जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात पालांदूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी करीत आहेत.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्‍विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, कोमल बनकर, रसिका कंगाले, दिनेश धार्मिक यांनी केली.