युवतीच्या मारेकर्यांचा तीन तासात शोध

0
13

गोंदिया,दि.03ः-युवतीची हत्या करून तिचा मृतदेह आमगाव तालुक्यातील अंजोरा-हलबीटोला जंगल शिवारात फेकणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या तीन तासांत यश मिळाले. पोलिसांनी ही कारवाई १ डिसेंबर रोजी केली असून ताराचंद शहारे असे आरोपीचे नाव आहे.
२९ नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय युवतीचा मृतदेह आमगाव तालुक्यातील अंजोरा-हलबीटोलाच्या जंगलात सकाळच्या सुमारास मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंजूषा श्रीराम दरवडे रा. गर्रा, ता. गोंदिया असे मृत युवतीचे नाव आहे. मंजूषा ही आमगावच्या रिसामा येथे आपल्या मावशीकडे राहत होती. दरम्यान, याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलिस अधीक्षक संदिप आटोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आमगावचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील हे आपल्या ताफ्यासह अंजोरा येथे पोहोचले व घटनास्थळाची पाहणी करून मृतकाचे नातेवाईक तसेच गावात चौकशी केली असता अंजोरा येथील ताराचंद इसूलाल शहारे यानेच खून केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताराचंद शहारे याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल केला. दरम्यान, त्याने खून का केला याचा तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, उमेश पाटील, सपोनि रमेश गर्जे, प्रमोद बघेले, पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस, मधूकर कृपाण, गोपाल कापगते, तुलसीदास चुटे, दीक्षितकुमार दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, धनंजय शेंडे आदींनी केली असून त्यांचे पोलिस अधीक्षक हरीश बैजल, अप्पर पोलिस अधीक्षक संदिप आटोळे यांनी अभिनंदन केले आहे.