लाच स्वीकारताना दुग्ध विकास अधिकार्‍यास अटक

0
15

भंडारा,दि.27ः-दहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यास अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजता सहाय्यक निबंधक यांचे कक्ष जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालय भंडारा येथे करण्यात आली.
मंगेश पांडूरंग दोनाडकर (४४) रा. क्वार्टर नं. १९७ ओल्ड सोमवारी नागपूर असे अटक करण्यात आलेल्या सहकार अधिकारी श्रेणी २ असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार प्रविण नत्थू मडामे (३८) रा. गणेशपूर यांनी मत्स्य व्यवसायासाठी संस्थेच्या नोंदणीकरिता सहाय्यक निबंधक यांचे कक्ष जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालय भंडारा येथे अर्जाची फाईल घेऊन गेले असता मंगेश दोनाडकर याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान सापळा रचण्यात आला असता आरोपी दोनाडकर मत्स्य व्यवसायाकरिता संस्थेची नोंदणीकरिता केलेल्या अर्जाची फाईल वरिष्ठांना मंजुरीसाठी सादर करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच त्यापैकी प्रथम हप्ता म्हणून १0 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पारधी करीत आहेत.