गोंदिया,दि.08ःधान खरेदीचे बील ऑनलाईन करून देण्यासाठी प्रती बिलामागे २00 रुपये लाच घेणार्या टेमणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह कर्मचार्याला आज, ७ डिसेंबर रोजी एसीबी पथकाने रंगेहाथ अटक केली. नरेश तिवारी असे अध्यक्षाचे तर सुशील कटरे असे ग्रेडरचे नाव आहे.तक्रारकर्ते शेतकरी व त्यांच्या पुतन्याने त्यांच्याकडील धान टेमणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर विक्रीकरिता नेले होते. यावेळी धानाचे वजन केल्यावर बील ऑनलाईन करण्याकरिता ग्रेडर कटरे यांनी त्यांच्याकडे प्रति बिल २00 रुपयांची मागणी केली.
मात्र, त्यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. दरम्यान एसीबी पथकाने टेमणी धान खरेदी केंद्रावर ग्रेडर कटरे यांना अध्यक्ष तिवारी यांच्या संगनमताने तक्रारकत्र्याकडून २00 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गोंदिया ग्रामीण पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचेपोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे व त्यांच्या पथकाने केली.




