वाशिम, दि. १० (जिमाका) : मानोरा वनपरिक्षेत्रातील खापरदरी बीटमधील राखीव जंगलात रानडुक्कर शिकारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वन अपराध केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागामार्फत आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) संजय नंदुरकर यांनी दिली आहे.
खापरदरी बीटमधील राखीव जंगलात काही लोक रानडुक्करांची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नंदुरकर यांनी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एम. राठोड यांना माहिती दिली व अधिनस्त वन कर्मचारी वृंदासमवेत खापरदरी राखीव वन खंड क्र. १४० मध्ये सर्च ऑपरेशन राबवून जंगलाची तपासणी केली. यादरम्यान खापरदरी धरणालगत रानडुक्करांचे तीन मृतदेह आढळून आले. याबाबत पंचनामा करून परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र, आरोपी आरोपी न सापडल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक एस. एस. सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री. नंदुरकर व श्री. राठोड हे करीत आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. आर. इंगळे, डॉ. सी. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
वाशिम वन विभागात वन्यजीवांची आवडिः शिकार, अवैध वृक्षतोड, वनवनवा, अवैध उत्खनन किंवा तत्सम अवैध प्रकारची माहिती वन विभागास कळविण्याचे आवाहन श्री. नंदुरकर यांनी केले आहे.




