सिवनी दि.23 :: मध्य प्रदेशातील भाजप आमदाराला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना गंडा घातला आहे. चोरट्यांनी आमदाराच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेतले. १९ दिवसांत त्यांनी चार लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यातून काढल्याचं तपासात उघड झालं आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी येथील भाजप आमदार दिनेश राय मुनमुन यांच्या बँक खात्यातून ४ लाख ५१ हजार रुपये चोरट्यांनी काढले आहेत. या प्रकरणी आमदार मुनमुन यांनी लखनादौन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तक्रारीनुसार, आमदारांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी ४ लाख ५१ हजार ४६५ रुपये काढले आहेत. नेट बँकिंगद्वारे ही रक्कम ११ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान काढण्यात आली. आपल्या खात्यातून लाखो रुपये काढल्याचे त्यांना १ मे रोजी समजले. कारचा विमा काढण्यासाठी त्यांना संबंधित एजंटना धनादेश द्यायचा होता. त्याआधी त्यांनी बँकेकडून स्टेटमेंट मागवला होता. स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले होते.सायबर सेलनं या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या दिवशी या पैशांतून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवलेल्या ओटीपीच्या आधारे त्यांनी नेट बँकिंगद्वारे खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खरेदी झाल्यानंतर आमदारांच्या मोबाइलवर ओटिपी पाठवण्यात आलेला नाही.
सायबर चोर हे आसाममधील असल्याचे तपासात उघड झाले आहे. लुटलेली रक्कम कुठे खर्च करण्यात आली आहे, याचाही तपास लागला आहे. सायबर पोलिसांच्या अहवालानंतर सिवनी पोलीस चोरट्यांना लवकरच बेड्या ठोकतील असे सांगण्यात येत आहे.





