आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस सुरुवात

0
112
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या पुढे ढकललेल्या परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत.  या दोन परीक्षेला १०,०२२  विद्यार्थी बसत असून, या परीक्षेची सर्व तयारी झाली आहे.  तृतीय वर्ष बीएची परीक्षा सकाळी तर तृतीय वर्ष बीकॉमची परीक्षा दुपारी होत आहे. या दोन्हीही परीक्षा ऑनलाईन होत आहेत.

परीक्षेची सर्व तयारी पूर्ण

या परीक्षेसाठी विद्यापीठाने सर्व तयारी केली असून दि. २० ते २५ ऑक्टोबरपर्यंत सहा वेळेस सराव परीक्षा घेण्यात आल्या. या  सराव परीक्षेत ८०५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राहिलेल्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना एसएमएसवर परीक्षेचा संदेश पाठविला असून, त्यांच्या ईमेलवर परीक्षेची लिंक पाठविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी १० दूरध्वनी असलेली हेल्पलाईन सुरु केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेचे प्रवेशपत्र असेल पण काही कारणामुळे लिंक गेली नसेल तर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास त्याला ती लिंक पाठविली जाते. हि हेल्पलाईन सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध आहे. हि हेल्पलाईन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत आहे.

विद्यार्थ्यास तांत्रिक सुलभता

हि परीक्षा विद्यार्थ्यास त्याच्या कॅमेरा असलेल्या कोणत्याही स्मार्टफोनवर, लॅपटॉप किंवा डेक्सटॉप कॉम्प्युटरवर  देता येईल. एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉगिन करू नये म्हणून परीक्षेसाठी चार तासाच्या वेळेचा स्लॉट दिला आहे, यातील कोणताही एक तास विद्यार्थी निवडू शकतो. विद्यार्थ्यांच्या ईमेलवर या परीक्षेची लिंक पाठविण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा लॉगिन आयडी व पासवर्डही दिलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी त्याला परीक्षेचे माहितीपत्रकदेखील पाठविण्यात आलेले आहे. सोबत त्यांना ऑनलाईन सहाय्यता देखील उपलब्ध करून दिली आहे.

दि. ३ व ६ ऑक्टोबरची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या ज्या विद्यार्थ्यांनी दि. ३ व ६ ऑक्टोबर २०२० रोजी ऑनलाईन परीक्षा यशस्वीरीत्या दिली असेल, त्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली नसेल किंवा तांत्रिक कारणास्तव ते पेपर सबमिट झाले नसतील, त्यानी हि परीक्षा द्यावी. तसेच  जर विद्यार्थ्यांनी ती परीक्षा देऊनही जर हि परीक्षा दिली तर दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील ते ग्राह्य धरले जातील असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

 ।। कोट ।।

परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे. परीक्षा देणाऱ्या आयडॉलच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.

– डॉ. सुहास पेडणेकर,कुलगुरू,मुंबई विद्यापीठ