तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला 5 लाखाचा राज्यस्तरीय कायाकल्प व्दितीय पुरस्कार

0
197

गोंदिया,दि.26 : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला सन 2019-20 चा कायाकल्प पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पाच लाखाच्या या राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला जाहिर झाला.तर जिल्ह्यातीलच गोरेगाव तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही पुरस्कार मिळालेला आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रानी या स्पर्धेत चांगले काम केले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने घेतलेली ही भरारीच म्हणावी लागणार आहे.

सन 2019-20 मध्ये राज्यातील सर्व रुग्णालयांची प्रथम तपासणी करण्यात आली. यात तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाने 100 पैकी 99.80 टक्के गुण मिळविले. तर अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर येथील ग्रामीण रूग्णालयाने 100 टक्के गुण मिळविले. त्यामुळे या रुग्णालयाला 15 लाखांचा प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला. तर तिरोड्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला द्वितीय पुरस्कार घोषित झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला हा पुरस्कार मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

कायाकल्प पुरस्काराचा मूलमंत्र

बाह्य परिसराची स्वच्छता, निटनिटकेपणा, सॅनिटायझेशन आणि हायजिण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल, सपोर्ट सर्विसेस (रुग्णांना दिल्या जाणार्‍या सेवा व सुविधा) हायजिन प्रमोशन, सर्वत्र स्वच्छता, आरोग्य व जनजागृती हाच या कायाकल्प पुरस्काराचा मूलमंत्र आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचविण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

सन 2016-17 मध्ये राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रुग्णालयांना अद्यावत करण्यासाठी ‘कायाकल्प’ योजना राबविली जाते. 21 डिसेंबर 2016 रोजी तिरोडा रुग्णालयाला या राज्यस्तरीय स्पर्धेत 15 लाख रुपयांचे प्रथम क्रमांक घोषित झाले होते. त्यावेळी सर्व राज्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करून सहापैकी सर्वोत्तम दोन रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. त्यात प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पुरस्कार तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले होते. त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात अदानी पॉवरने केलेल्या सुविधा

सन 2016 मध्ये अदानी पॉवरच्या वतीने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या विकासासाठी सहकार्य केले होते. त्यात कॅज्युअल्टीच्या अद्यावतीकरणासाठी क्रॅशकार्ड मशीन, एक मल्टी पॅरामीटर, दोन एसी, पाच पाउलर बेड, सेंट्रल नर्सिंग स्टेशनमध्ये एक एसी व फर्निचर वर्क्स, ओपीडीमध्ये फर्निचर वर्क्स, टिन वूडन आलमारी, पेंटिंग, पार्टिशन विंडो व स्लायडिंग विंडो, पाल्स हिलिंग, इलेक्ट्रिक वर्क्स, हाऊस कीपिंग व लँड कीपिंगसाठी मदत अदानी पॉवरने केली होती. शिवाय सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना 5-एसचे ट्रेनिंग दिले होते.

उपजिल्हा रुग्णालयातील सोयी-सुविधा

हे उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे असून एयर कंडिशनची सोय आहे. डेन्टल ओपीडी, सोनोग्राफी, टेलिमेडिसीन, सिजर ऑपरेशन, क्रॅशकार्ड मशीन, सेंट्रलाइझ ऑक्सीजन सेंट्रल सक्शन युनिट, चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर, आकस्मिक कक्ष (आयसीयू), मल्टीपर्पज मॉनिटर, डीफेब्रिलायझेशन, इसीजी व नेब्युलायझेशन मशीन्स आदि सुविधा आहेत. रुग्णालय व परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी येथील टीम प्रयत्नशील राहते.