शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळा सुरु कराव्या-जिल्हाधिकारी संदीप कदम

शाळेचे निर्जंतुकीकरण करावे ;; शिक्षकांची कोविड चाचणी बंधनकारक;; पालकांची लेखी संमती आवश्यक;; मास्क व सुरक्षित अंतर अनिवार्य;; विद्यार्थांच्या आरोग्याला प्राधान्य द्या

0
655

भंडारा दि. 19: राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्या- टप्याने सुरु करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर शैक्षणिक वर्ष 15 जुन पासुन सुरु झाले असले तरी राज्यातील इयत्ता 9 ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसारच शाळा सुरु कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.

                विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व आरोग्य धोक्यात येणार नाही ही बाब डोळयासमोर ठेवून शिक्षण विभाग व शैक्षणिक संस्थांनी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगीतले. शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभुमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी सचिन पानझाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक एस.टी. डोर्लीकर व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

                शालेय शिक्षण विभागाने 10 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. विद्यार्थांनी शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था, शारिरीक अंतर  नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी. शाळेत दर्शनी भागावर शारिरीक अंतर व मास्क वापर इत्यादी बाबत मार्गदर्शन सुचना असणारे पोस्टर- स्टिकर प्रदर्शित करावे.

                शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 17 ते 22 नोव्हेंबर 2020 या दरम्यान कोविड 19 साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनास सादर करावे, ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत त्यांनीच शाळेत उपस्थित रहावे. शाळेतील गर्दी टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. 50 टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित 50 टक्के दुसऱ्या दिवशी बोलवावेत. इयत्ता निहाय ऑनलाईन व ऑफलाईन वर्गाचे वेळापत्रक तयार करावे.

                शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध घातलेले आहे. परीपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक- पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृध्द कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध- उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.

                संपुर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. हात धुण्यासाठी शाळेत सुविधा उपलब्ध असावी. एखाद्या शाळेत क्वारंटाइन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे व शाळा निर्जंतुकीकरण करावी. शाळेत तापमापक गण व ऑक्सीमीटर आवश्यक आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना शक्यतो स्कुल बसने शाळेत न पाठवता. स्वत: शाळेत सोडावे व घेवून यावे. शाळांनी पालक- शिक्षक असोसिएशन सोबत बैठक घ्यावी विचार विनिमय करावा, व समन्वयाने निर्णय घ्यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा सुरु करतांना विद्यार्थांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले. शाळांनी 10 नोव्हेंबर 2020 च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोर पालन करावे असे त्यांनी सांगितले.