कोरचीत ८८ शाळांमधील शिक्षक अडचणीत

0
10

कोरची दि.३0: राज्य शासनाने २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या निर्णयानुसार ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमण्याचे धोरण अवलंबिले आहे. कोरची तालुक्यातील ८८ शाळांची पटसंख्या ३0 पेक्षा कमी असल्याने या शाळांमधील शिक्षक अडचणीत येण्याची चिन्ह आहे.
तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये दोन शिक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र या दोन शिक्षकांसाठी नव्या शासन निर्णयानुसार किमान ६0 पटसंख्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरची तालुक्यात एक ते नऊपर्यंत पटसंख्या असलेल्या २९ शाळा, १0 ते १९ पटसंख्या असलेल्या ३८ शाळा तर २0 ते २९ पटसंख्या असणार्‍या २१ शाळा आहेत. जर ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमण्याचे धोरण अवलंबिल्यास कोरची तालुक्यातील एकूण ११४ शाळांपैकी ८८ शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांचे दुसर्‍या शाळेत समायोजन करण्याची नवीन समस्या शिक्षण विभागासमोर निर्माण होणार आहे.