भंडारा शहरातील जडवाहतूक अन्यत्र वळवा

0
10

राजेंद्र दोनाडकर
भंडारा दि.३0: शहरातून सुरु असलेली जड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारी अडचण, बस थांब्याची जागा सुरळीत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारला शहरातील रस्त्यांची पाहणी केली.
तुमसर मार्गावरुन येणारी जड वाहने पवनी व साकोलीकडे जाण्यासाठी शहरातून जातात. त्यासाठी असलेला बायपास मार्ग हा खराब असल्याने ही वाहतुक शहरातून होते. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा हेऊन अपघाताची शक्यता असते. हा बायपास मार्ग दुरुस्त करुन शहरातून होणारी जड वाहतुक त्या रस्त्याने वळवावी, अशा सूचना गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता खडसे यांना केल्या. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावर शासकीय कार्यालय, न्यायालय व शाळा आहेत. त्यामुळे या मार्गावरुन होणार्‍या भरधाव वाहतुकीमुळे अपघात होतात. या रस्त्यावरील वाहनांचा वेग कमी होण्यासाठी जिल्हा परिषद चौक, सेंट पॉल शाळा आणि त्रिमुर्ती चौकात रम्र्बस आणि फ्लॅशर्स बसवावे. कारधा पुलावरुन होणारी जड वाहतुक थांबवण्यासाठी हाईट बॅरिअर लावण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, खांब तलाव चौक, लॉयब्ररी चौकातील बस थांब्याची पाहणी केली. या थांब्यांमुळे वाहतूक वाहतुकीस अडथळा होत असल्यामुळे हे थांबे दूर अंतरावर करावे. तहसिल कार्यालयासमोरील बस थांबा दुसरीकडे करावा, अशा सूचना केल्या. याशिवाय मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणामुळे वाहतुकीस खोळंबा होत असल्याचे निर्दशनास आल्यामुळे ही अतिक्रमणे काढण्याच्या सूचना मुख्याधिकारी रविंद्र देवतळे व उपविभागीय अधिकारी डॉ.खिल्लारी यांना केले आहे. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एन. गाणार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता डहाके, गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता अ.भा. खडसे, प्रादेशिक उपपरिवहन अधिकारी अतुल आदे, वाहतुक सहाय्यक निरिक्षक दुबे उपस्थित होते.