इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीचे उद््घाटन : बाल वैज्ञानिकांच्या प्रतिकृतींचा समावेश

0
9

‘स्पर्धात्मक व शिस्तप्रिय शिक्षणाची गरज’

सौंदड दि. १३: सांस्कृतीक कार्यक्रम व प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचे प्रदर्शन होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. आजचा बालक येणार्‍या काळाचे भविष्य निर्माणकरणार. यासाठी स्पर्धात्मक व अनुशासनमय शिक्षणाची गरज असून त्यातूनच भावी पिढीला योग्य दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.या जिल्हास्तरीय प्रदर्शनीत जिल्ह्यातील विविध शाळांतील चिमुकल्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. अशा २९७ प्रतिकृतींचा या प्रदर्शनीत समावेश असून चिमुकल्या वैज्ञानिकांच्या या प्रतीकृतींचे निरीक्षण करून पाहुण्यांनी आश्‍चर्य व कौतूक केले. आजचे हे चिमुकले उद्याचे देशातील मोठे वैज्ञानीक म्हणून पुढे येतील अशी प्रतिक्रीयाही याप्रसंगी पाहुण्यांनी न चुकता व्यक्त करून चिमुकल्यांना प्रोत्साहीत केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने येथील आर.जे.लोहिया विद्यालयात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनीच्या उद््घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद््घाटन याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य लता दोनोडे, रजनी गौतम, गिरीश पालीवाल, माधुरी सावकर, माधुरी पाथोडे, शिक्षण संस्था अध्यक्ष जगदीश लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शरद खंडागळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) घनश्याम पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना मेंढे यांनी, भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची आठवण करीत, आजच्या वैज्ञानिक युगात विज्ञान विषयाला सर्वाधिक महत्व असून स्पर्धात्मक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धीक आणि शारिरीक विकास होऊन देश आत्मनिर्भर होणार असे मत व्यक्त केले. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही प्रदर्शनीचे वैशिष्ट सांगून मार्गदर्शन केले. दरम्यान शिक्षण विभागाच्यावतीने पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन कल्पना काळे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस.मोटघरे यांनी मानले.
कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्था उपाध्यक्ष आ.न.घाटबांधे, जेष्ठ शिक्षक के.डी.रहेले, मुख्याध्यापक गुलाबचंद चिंधालोरे, मनोज शिंदे, आशा तिवसकर, बाच्छल, प्रभुदयाल लोहिया, कन्हैयालाल लोहिया, राधेश्याम लोहिया, पंकज लोहिया यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येत उपस्थित होते.