अन् ‘त्यांनी’ साधला शेततळ्यावर संवाद

0
14

मोहाडी दि. १३: शेतकर्‍यांनी सिंचन व्यवस्थेवर भर द्यावा. पिकाची उत्पादन क्षमता वाढवावी यासाठी शासनातर्फे विविध उपाय राबविले जातात. गाव शिवारातील पाणलोट कार्यक्रमाची स्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी चक्क खासदार नाना पटोले पारडी गावातील शेततळ्यावर गेले तेथेच गावकर्‍यांनी मनमोकळेपणे संवादही साधला.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेण्याकरिता खासदार नाना पटोले मोहाडी येथे आले होते. अचानक त्यांनी मोहाडी नजिकच्या पारडी गावाला भेट दिली. तेथील राष्ट्रीय कृषी विकास व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेततळी तयार करण्यात आली. त्याची पाहणी केली. यावेळी शेततळ्यावरच गावकरी व शेतकर्‍यांशी संवाद साधला. नैसर्गिक संसाधनावरील उपचारात्मक कामाविषयी समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकर्‍यांना मार्गदर्शनही केले.
पारडी गावातील शेतक्षेत्रात बंधारे बांधून विकास आराखडा तयार करावा. याविषयी अधिकार्‍यांना निर्देश दिले. तसेच यावेळी उपजीविका उपक्रमातून बचत गटांना व भूमिहीन लाभार्थ्यांना फिरत्या निधीतून केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनीही ग्रामवासीयांना विविध योजनेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सोनुले, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, सभापती हरिश्‍चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच उषा बोंदर, संचालन व आभार सुधीर पडोळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.