अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालयात अडीच हजार जागा रिक्त

0
11

गडचिरोली,दि.१५::शासन व शिक्षण सम्राट शैक्षणिक विकासाचा गवगवा करीत असले तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती चांगली नाही. या दोन्ही जिल्ह्यातील २३७ महाविद्यालयात शैक्षणिक अर्हताधारक पूणवेळ प्राचार्य व प्राध्यापकांच्या २४८२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा ‘खेळखंडोबा’ झाला आहे. गोंडवाना विद्यापीठाने या महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्याबाबत वेळोवेळी नोटीस बजाऊनही पदभरतीची कारवाई केली नाही.
महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय शिक्षणात गुणात्मक सुधारणा करण्यावर शासनाने अलिकडे भर दिला आहे. त्यासाठी महाविद्यालयामध्ये उच्च अर्हताधारक पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापकांची नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी ३१ मे २0१४ रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या बैठकीत पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंना बजावले होते. पुढे राज्याचे शिक्षण संचालक प्र. रा. गायकवाड यांनीही दोन महिन्यात जागा भरण्याची ताकीद दिली होती. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाने रिक्त जागांचा अनुशेष असलेल्या संबंधित महाविद्यालयांना अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठांतर्गत ६७ अनुदानित व १७0 कायम विना अनुदानित असे एकंदरीत २३७ महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ व अर्हताधारक प्राचार्य आणि प्राध्यापक नाहीत.