नितीशकुमार पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार

0
8

 

पाटणा दि.१५: बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारीमुंड्या चीत करणाऱ्या महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड झालेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी शनिवारी सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होतील.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केल्यावर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले असल्याचे कुमार यांनी सांगितले. २० नोव्हेंबरला दुपारी

२ वाजता गांधी मैदानात त्यांचा शपथविधी होईल. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने निवडणुकीपूर्वी महाआघाडी स्थापन केली होती. आपल्या मंत्रिमंडळात तीनही पक्षांचे नेते असतील आणि त्यांनाही याचवेळी शपथ देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या आकाराबद्दल विचारले असता संवैधानिक तरतुदींनुसार सदस्य संख्या निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी सायंकाळी नितीशकुमार यांची एकमताने महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. विधिमंडळ पक्षांच्या संयुक्त बैठकीत राजद संसदीय मंडळाच्या प्रमुख राबडीदेवी यांनी ६४वर्षीय नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले. चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्याने या निवडणुकीपासून वंचित राहिलेले राजद प्रमुख लालुप्रसाद यादव हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचे सार्थक करण्याकरिता आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असे नितीशकुमार यांनी नंतर महाआघाडीच्या आमदारांना संबोधित करताना सांगितले.