शिक्षकांची संचमान्यता रख़डली

0
13

गोंदिया दि,24:- दरवर्षी ३0 सप्टेंबरपर्यंत पटावर असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शाळांवरील शिक्षकांची संचमान्यता निश्‍चित केली जाते. पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २0१५ ची तर दूर, २0१३-१४ या वर्षाचीच संचमान्यता अद्याप निश्‍चित झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दुसरीकडे संचमान्यता मिळायची असल्याचे सांगत शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून चक्क जि.प. पदाधिकारी आणि सदस्यांचीही दिशाभूल केली जात आहे. सन २0१५-१६ हे शैक्षणिक वर्ष सुरू असले तरी सन २0१३-१४ ची संचमान्यता अद्याप निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन सन २0१२-१३ च्या संचमान्यतेनुसारच काढण्यात येत आहे. यावरून शिक्षण विभागात किती घोळ सुरू आहे याची कल्पना येते.
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाला लुबाडणार्‍या काही खासगी शाळा तसेच २0 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतील पटसंख्या दाखवा, त्यानंतरच संचमान्यता मिळेल असे ठरवून शासनाने ३0 सप्टेंबरपर्यंत संच मान्यता निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यात अद्याप सन २0१३-१४ या शैक्षणिक वर्षाचीच संचमान्यता झालेली नसून सर्वत्र गोंधळात गोंधळ सुरू आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन सन २0१२-१३ च्या संच मान्यतेनुसार काढण्यात येत आहे.
शासनाने यावर्षी सरल पध्दतीने संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन करावी असे निर्देश दिले. शासनाने ही माहिती मागितल्यावर एकदा मागविलेली माहिती पुन्हा-पुन्हा मागावी लागणार नाही असे शासनाला वाटत होते. परंतु संच मान्यतेची माहिती दरवर्षी बदलत असल्यामुळे शासनाने पुन्हा ती माहिती यू-डायस पध्दतीने मागविली आहे.