चालक, बालक व पालक हेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीचे प्रेरणास्त्रोत- लोकेश अग्रवाल

0
12

 

बालिकादिनानिमित्त बिरसी येथे चावडी वाचन

देवरी- स्पर्धेच्या युगात अभ्यास करणारा विद्यार्थीच समाजात टिकाव धरू शकतो. विविध क्षेत्राचा ज्ञान त्या विद्यार्थ्यांना असावा, याकरिता शाळा स्तरावर शिक्षकवर्ग प्रयत्नशील असतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाप्रती शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची व पालकांची तेवढीच जबाबदारी आहे. चालक, बालक व पालक एकत्र आले तर विद्यार्थ्यांचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन आमगाव पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल यांनी केले.
आमगाव तालुक्यातील बिरसी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित बालिका दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य छबू उके, सरपंच राजाराम राऊत, शाळा समितीचे अध्यक्ष राजकुमार चौधरी, प्रल्हाद चौधरी, पी.के. चौधरी, आशा दखणे, सेवानिवृत्त शिक्षक राजाराम सोनवाने, पुस्तकला खैरे, संध्या पटले, उषा कटरे, छाया सोनवाने, मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडत त्यांनी केलेल्या समाजकार्याला नेटाने पुढे नेण्याचा आग्रह उपस्थितांपुढे धरला
यावेळी इयत्ता १ ते ५ या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बावणथडे यांनी केले. उपस्थितांचे आभार विकास लंजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता मानकर, चंदा बिसेन, भुमेश्वरी अंबुले, लता टेंभुर्णीकर, सत्यकला सोनवाने. धनवंता पटले, प्रेमिका सोयाम, ममता पटले आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.