प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

0
19

अर्जुनी मोर,दि.11ः– तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वात आज 11 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान गटशिक्षणाधिकार्‍यांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.माहे फेब्रुवारीच्या वेतनापासून एकमेव अर्जुनी मोरगाव तालुका वंचित असून फेब्रुवारी 2022 च्या प्रलंबित  वेतनामुळे आयकर भरण्याकरिता अतिरिक्त शुल्क किंवा दंड मोजावे लागणार आहे. 2019 पासून रखडलेला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता जीपीएफला अद्यापर्यंत पाठवण्यात आलेला नाही.2021 पासून प्रलंबित जीपीएफचा दुसरा हप्ता देखील पाठवण्याबद्दल कोणतीच कार्यवाही सुरू नाही.दरमहा पगारातून कपात होणार्‍या पीएफ रक्कम विवरणपत्र एप्रिल 2020 पासून आजपर्यंत जिपला पाठवण्यात आलेले नाही.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशान्वये मार्चचे वेतन एकस्तरनुसार काढणे बाबतची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.बीएलओकरिता नियुक्त प्राथमिक शिक्षकांना वगळण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समितीकडून एसडीओ कार्यालयाला अद्यापर्यंत पाठवण्यात आलेला नाही.
सेवापुस्तकातील नोंदी मागील तीन वर्षापासून अद्यावत केलेल्या नाहीत यासह शिक्षकांच्या इतरही अनेक प्रश्न प्रलंबित होते.या मागण्यांची पूर्तता व्हावी,या मागणीसाठी आज 11 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान गटविकास अधिकारी विलास निमजे व गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे यांनी 22 एप्रिलपर्यंत शिक्षकांच्या मागण्यांचे निराकरण करण्याचे लेखी पत्र दिले आहे.लेखी आश्वासनानंतर शिक्षक समितीने हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले.प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास हांडगे यांनी,संचालन तालुका सचिव श्रीकृष्ण कहालकर व आभार तालुका कार्याध्यक्ष दिलीप लोधी यांनी मानले.