स्व. सुरेश इंगोले यांच्या आठवणींना उजाळा

0
10

सीआयडीचे अधिकारी ते उपप्राचार्य
कला,शिक्षण,साहित्य क्षेत्रात मुशाफिरी

शहापूर,दि.27- बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी असलेले नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालय, शहापूरचे माजी उपप्राचार्य स्व. सुरेश इंगोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात ‘स्मृतिगंध’ या श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी ग्राम विकास समितीचे अध्यक्ष मुकुंद फेंडरकर होते.  ज्येष्ठ पत्रकार प्रा. वामन तुरिले, प्रा. नरेंद्र पालांदूरकर, भास्करराव इंगोले, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, प्राचार्य विनोद भोंगाडे आणि श्रीमती आशा इंगोले यांची उपस्थिती होती.
स्व. प्रा. सुरेश इंगोले यांचे मागील वर्षी २४ एप्रिलला कोरोनाकाळात निधन झाले होते. एकेकाळी मुंबईत सीआयडी विभागात फिंगरप्रिंट तज्ज्ञ ते निवृत्त उपप्राचार्य असा सुरेश इंगोले यांचा थक्क करणारा प्रवास होता. लहानपणापासून बुध्दीनं तल्लख असलेल्या सुरेश यांना त्याकाळी शाळेनं थेट चौथ्या वर्गात प्रवेश दिला होता. दोन्ही हाताने लिहिण्याची कला त्यांना अंगभूत होती. वाचनाची आवड इतकी की दिवसाला दोन पुस्तके वाचायचीच, या नेमाने त्यांनी झपाटल्यागत वाचन केलं होतं. आदर्श शिक्षक, उत्तम चित्रकार, प्रतिभावान कवी, लेखक, कलावंत अशी चतुरस्त्र मुशाफिरी त्यांनी केली. समाजमाध्यमांवरच्या त्यांच्या लिखाणामुळे ते लोकप्रिय होते. महाविद्यालयात राज्यशास्त्र, इतिहास आणि इंग्रजी विषय ते शिकवत असत. या विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना चित्रकला, लेखन आणि वक्तृत्व कलेसाठीही त्यांनी कायम प्रोत्साहित केलं. इंग्रजी, मराठी शब्दकोडी सोडवण्याचा त्यांना छंद होता. ‘लोकरंग’ साप्ताहिकासाठीही काही वर्षे त्यांनी शब्दकोडी तयार करून दिली होती. दूरदर्शनवर हिंदी आणि काही काळाने मराठी चित्रपट शनिवार-रविवारी दाखवले जात. सुरेश यांनी १९८४ पासून दूरदर्शनवर दाखवलेल्या चित्रपटांचा तपशिलवार माहितीसंग्रह केला होता. जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन आणि कुठल्याही प्रसंगाला हसत हसत सामोरं जाण्याची वृत्ती यामुळे त्यांनी ‘मजेत जगावं कसं ?’ याचा वस्तुपाठ घालून दिला होता. आजी माजी शिक्षक, स्नेही आणि आप्तस्वकियांकडून इंगोले यांच्या अशा अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या जीवनावर आधारीत एक ध्वनिचित्रफितही यावेळी दाखवण्यात आली.
स्व. सुरेश इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव पंकज, सारंग आणि पराग यांनी वर्ग 12 कला व विज्ञान शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5001/ रुपये तर 12 वी मध्ये राज्यशात्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला 2100/ चे पारितोषिक दरवर्षी देण्यात येईल अशी घोषणा केली. प्रास्ताविक पंकज इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पितांबर उरकुडे आणि प्रा. मोहरील यांनी केले. आयोजनासाठी श्रीकांत हरडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामविकास समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.