गोंदिया शासकीय तंत्रनिकेतनला उत्कृष्ट संस्था मानांकन

0
32

– २४ संस्थामधून निवड
– सर्व शाखा अद्ययावत
– शैक्षणिक गुणवत्तेत वाढ

          गोंदिया : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई तर्फे मंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व पदविका अभ्यासक्रमाचे वार्षिक शैक्षणिक अवेक्षण करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक शैक्षणिक अवेक्षण मे महिन्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई कडून नियुक्त विविध चमुनी गोंदिया व भंडारा जिल्हातील एकूण २४ संस्थाचे शैक्षणिक अवेक्षण केले. यात गोंदिया शासकीय तंत्र निकेतनच्या सर्व शाखा अत्युत्कृष्ट दर्जाच्या ठरल्या असून या संस्थेला उत्कृष्ट संस्था मानांकन प्राप्त झाले आहे.

         शैक्षणिक अवेक्षण मध्ये मुलभूत सुविधा, विद्यार्थ्यांचा निकाल, प्लेसमेंट, प्रयोगशाळा, अधिव्याख्यात्यांची संख्या, अधिव्याख्यात्यांची शैक्षणिक अहर्ता, टीचिंग लर्निंग प्रोसेस व इतर सर्व मापदंड शाखा निहाय तपासले जातात. शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे एकूण ६ शाखा आहेत, यंत्र अभियांत्रिकी, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान यापैकी संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान शाखांना मागील शैक्षणिक अवेक्षण मध्ये अत्युत्कृष्ट दर्जा मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक अवेक्षण यावर्षी करण्यात नाही आले.

         यंत्र अभियांत्रिकी, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी या शाखांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता शैक्षणिक अवेक्षण करण्यात आले. यामध्ये सर्व शाखांना अत्यकृष्ट दर्जा प्राप्त झाला. गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील सर्व ६ शाखाना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई तर्फे अत्युत्कृष्ट दर्जा देण्यात आलेले आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व संस्थामधील सर्व शाखा अत्युत्कृष्ट असलेले शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया ही एकमेव संस्था आहे. अशी माहिती शैक्षणिक सह-समन्वयक प्रा. नितीन गुल्हाणे यांनी दिली.

१) डॉ. सी.डी.गोळघाटे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया-  “संस्था निरंतर प्रगतीशील आहे. भविष्यात संस्थेला महाराष्ट्रात एक नंबर वर आणण्याचे ध्येय आहे.”

२) डॉ. राम निबुदे, विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी- स्थापत्य विभागात उच्च विद्या विभूषित अध्यापक तसेच सुसज्ज प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता सातत्त्याने प्रयत्न केले जातात. स्थापत्य शाखेचे 95 टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता नावाजलेल्या संस्थेमध्ये प्रवेशास पात्र होतात. या विभागामार्फत इतर शासकीय विभागाकरिता बांधकाम विषयक सल्लागार सेवा पुरवलेली जाते, ज्याच्या सुद्धा विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या लाभ होतो.

३) डॉ. प्रशांत शर्मा, विभाग प्रमुख, अणुविध्युत व दूरसंचार अभियांत्रिकी- “शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया सारखी संस्था गोंदिया विभागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहार असे म्हटले तर अतिशयोक्ती  होणार नाही. उच्च शैक्षणिक व तांत्रिक गुणवत्तासाठी सर्व सुविधा, अनुभवी शिक्षक, संस्थेचे वैशिष्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक व्यक्तित्व विकास साठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

४) डॉ. गजानन गोतमारे, विभाग प्रमुख, विद्युत अभियांत्रिकी-  “विद्युत अभियांत्रिकी विभागात एकूण सहा सुसज्य प्रयोग शाळा असून, यंदा एका प्रयोगशाळेकरिता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) कडून निधी प्राप्त झालेला आहे. तसेच AICTE Training and Learning (ATAL) Academy मार्फत प्राप्त झालेल्या निधीतून राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे”

५) प्रा. गुलाब डाहोले, विभाग प्रमुख, यंत्र अभियांत्रिकी –  योग्यताप्राप्त प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासमवेत मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे दिग्दर्शन करण्याचा मान  मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ द्वारे तयार केलेली शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रेरित करण्यात येते.

६) प्रा. स्वप्नील अंबादे, शैक्षणिक समन्वयक-  “कुठल्याही संस्थेला अत्युत्कृष्ट दर्जाची बनवण्यास संस्थेतील प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा समावेश असतो, या संस्थेतील मनुष्यबळ व विद्यार्थी हे अत्युत्कृष्ट असल्याने संस्थेला अत्युत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन टिकवून ठेवण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.