विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतच जात प्रमाणपत्र;एसडीओ अर्जुनी मोरगाव यांचा पुढाकार

0
12

जात प्रमाणपत्र वितरणाचा कालबद्ध कार्यक्रम

 गोंदिया,दि.27 : उपविभाग अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पहिली ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान कागदपत्र व शासकीय दरात जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला असून ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान जात प्रमाणपत्र वितरणाचा विशेष कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र उपलब्ध तर होणारच आहे सोबतच पालकांच्या वेळेची व पैशाचीही बचत होणार आहे. यासाठी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची भूमिका अतिशय उपयुक्त व मोलाची आहे.

         अनु. जाती, अनु. जमाती, इमाव, विजा, भज, विमाप्र इत्यादी प्रवर्गातील विध्यार्थांचे जात प्रमाणपत्र काढतांना त्यांच्या पालकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात आल्यावर उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून किमान कागदपत्र व शासकीय शुल्क दरात उपलब्ध करुण देण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व शाळांच्या सहकार्यातुन ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शाळेतच दाखले वितरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

          शिबिराचे वेळापत्रक तालुक्यातील सर्व शाळांना पाठविले असून शाळेच्या  प्रशासनाने त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३१ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२३ सर्व केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांनी ज्या विद्यार्थांकडे जातीचे दाखले नाहीत त्यांची यादी तयार करुन अर्ज भरुन घेणे, दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करणे, शुल्क रक्कम जमा करणे, ०८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी प्राप्त झालेले अर्ज सेतु चालक यांचेकडे सादर करणे व सेतुचालक यांनी प्राप्त अर्ज तपासून घेणे व ऑनलाईन नोंद करण्याची प्रक्रिया पार पाडावी.

          १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडुन ऑनलाईन दाखले मंजुर केली जाणार आहेत. मंजूर जात प्रमाणपत्र केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचे मार्फत शाळेत उपलब्ध करुण देण्यात येईल. वरील प्रमाणे शिबिरे घेण्याचे प्रस्तावित आहे. तरी सदर शिबिरांचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.