कुष्ठरोग निर्मूलन अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

0
16
  • स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा ३० जानेवारी पासून 
  • २०३० पर्यंत शून्य कुष्ठरोग रुग्ण लक्ष

गोंदिया,दि.27 : जागरूकता व शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे समाजात कलंक आणि भेदभाव होतो, ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबद्दल गैरसमज वाढतात. कुष्ठरोगाशी संबंधित कलंक आणि भेदभावाचे निराकरण करण्यासाठी तसेच समाजात जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात येणार आहे. कुष्ठरोग निर्मूलन अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

           मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ.रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, नायब तहसीलदार एन.एस. चवरे व सहायक पोलीस उपनिरीक्षक डॉ.अभय आंबिलकर उपस्थित होते.

          कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊनकुष्ठरोगाला इतिहास जमा करू या‘ हे यावर्षीच्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे. लवकर निदान व वेळेत उपचाराचे महत्त्व तसेच कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे. या अभियानात विविध उपक्रम राबवून कुष्ठरोगाविषयी माहिती व जनजागृती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने शाळेत प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबतचे संदेश, प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, कुष्ठरोगावरील म्हणी व घोषवाक्य स्पर्धा आदींचा समावेश असणार आहे.

          सन २०३० पर्यंत शून्य कुष्ठरोग रुग्ण हे लक्ष गाठायचे असल्याने या अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. एक दिवस शाळेसाठी व दप्तरमुक्त शाळा या उपक्रमाला हे अभियान जोडावे व  दप्तर मुक्त शाळा उपक्रमाच्या व्यासपीठावर कुष्ठरोग जनजागृती अभियान मांडावे अशी सूचना मूख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी मांडली.

          या अभियानात पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्राम विकास, नागरी विकास, माता व बाल संगोपन केंद्र, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका इत्यादी कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याने डॉ.रोशन राऊत यांनी सांगितले. या अभियाबाबत त्यांनी सविस्तर सादरीकरण केले.