मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
5

पुणे, दि. 10: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सिम्बायोसिस विश्वभवन येथे क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. अश्विन फर्नांडिस लिखित ‘इंडियाज नॉलेज सुप्रीमसी : द न्यू डॉऊन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी उपस्थित होते.

आपले ज्ञान विश्वात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आपल्याला स्थिती, काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फक्त आपल्या पूर्व वैभवाचा गौरव करून चालणार नाही. भूतकाळापासून शिकावे, वर्तमानात जगावे आणि भविष्याकडे पहावे या पद्धतीने पुढे जायला हवे.

जागतिक क्रमवारीमध्ये (रँकिंग) भारतीय विद्यापीठांचे स्थान कसे सुधारावे यासाठी प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी सिम्बायोसिसचे अभिनंदन केले. या पुस्तकामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पूर्ववैभवाचा, महान बुद्धीवंतांच्या विचारांचा दाखला देऊन उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजनांची माहिती चांगल्याप्रकारे दिल्याचे श्री. कोश्यारी म्हणाले.

भारतातील बुद्धीवंत विदेशात जाऊन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषवतात. त्याप्रमाणे आपल्या विद्यापीठांनाही विश्वस्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पूर्वीच्या काळात आपला देश ज्ञानाच्या बाबतीत उत्कृष्ट होता. हे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले.

बुद्धिमान लोकांनी आपल्या मुलांना संस्कार द्यावेत, देशाविषयी, मातृभाषेविषयी गौरव भावना निर्माण करावी.  शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याकडे समर्पित भावनेने पाहिले पाहिजे, असेही श्री. राज्यपाल म्हणाले.

पुस्तकाचे लेखक आणि मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्सचे प्रादेशिक संचालक व क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. फर्नांडिस म्हणाले, भारताच्या  शैक्षणिक पूर्व वैभवाकडे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या एकही भारतीय विश्वविद्यापीठ जगात पहिल्या १०० क्रमांकामध्ये नाही. मात्र, ऐतिहासिक काळातील विद्यापीठांचा दाखला घेत शिक्षण संस्थांना नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील.

कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.