रिसोड येथील ” आपला दवाखाना ” चे मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्घाटन  

0
11
वाशिम दि.10- रिसोड येथील पोलीस स्टेशनजवळ सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी  ९ फेब्रुवारी रोजी फित कापून उद्घाटन केले.यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई येथून आयोजित कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत,पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आमदार आशीष शेलार, आमदार भरत गोगावले, आरोग्य विभागाने प्रधान सचिव संजय खंदारे,आयुक्त धीरजकुमार यांची प्रमुख उपस्थितीत होती.
                रिसोड येथील आपला दवाखानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे,रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजयमाला आसनकर,पंचायत समितीच्या सभापती केशरबाई हाडे,नगर पालिकेचे आरोग्य समिती सभापती संतोष चराटे,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, तहसीलदार अजित शेलार,गट विकास अधिकारी श्री. राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
         यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांचेशी संवाद साधला.जिल्ह्यातील १५ पैकी ६ ठिकाणी हे दवाखाने सुरू होत असल्याची माहिती श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी दिली.
        मुख्यमंत्री संवाद साधताना म्हणाले,गोरगरिबांना या दवाखान्याचा लाभ होणार असून मोफत आरोग्य तपासणी,उपचार व चाचण्या करण्यात येणार आहे.राज्यात ३५६ तालुक्यात आपला दवाखाना सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.रिसोड येथील कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील नागरिक तसेच आरोग्य व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.