शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाला राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेचे मानांकन प्राप्त

0
22

तीन पदविका अभ्यासक्रमांना तीन वर्षांसाठी नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनचा दर्जा

गोंदिया,दि.10 : शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथील तीन अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशन (NBA), नवी दिल्ली यांचे तीन वर्षांसाठी मानाकन प्राप्त झालेले आहे. वॉशिंग्टन एकॉर्ड  (मान्यता संस्थांचे जागतिक संघ) अंतर्गत नियमाच्या आधारित असलेले हे मानांकन असून यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह 29 देशांच्या बरोबरीने हे मानांकन देण्यात आलेले आहे. हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे अलीकडे प्राप्त झालेल्या उत्कृष्ट संस्था मानांकनच्या वरचे मानांकन आहे. 2022-2025 या कालावधीत यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञानातील या अभ्यासक्रमाना NBA मानांकन प्राप्त झालेले आहे. ही नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशन मान्यता 9 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान देशातील सर्वोच्च विद्यापीठे/संस्थांच्या चार वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने केलेल्या तपासणीच्या आधारे देण्यात आले. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे प्राचार्य प्रा.(डॉ.) सी.डी.गोळघाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

          यावेळी डॉ. आर.एन.निबुदे, विभाग प्रमुख माहिती तंत्रज्ञान, डॉ. पी.एस.शर्मा, विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी, प्रा. जी.एच.डाहोले, विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी, डॉ. जी.व्ही.गोतमारे, मुख्य NBA समन्वयक, प्रा. एन.एन.निकोडे, समन्वयक, विज्ञान आणि मानविकी, डॉ. हेमा भुसारी, TPO, प्रा. स्वप्नील अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते.

        शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया ही महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील प्रमुख संस्थांपैकी एक असुन सन 2009 मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला संस्थेची विध्यार्थी क्षमता 240 होती. सध्या संस्थेची वार्षिक विध्यार्थी क्षमता 360 आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यावसायिक मानकांसाठी सक्षम आणि वचनबद्ध असलेले प्रख्यात अभियंते विकसित करणे हे गोंदिया शासकीय तंत्रनिकेतनचे उद्दिष्ट आहे. संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस यंत्र अभियांत्रिकी, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. तदनंतर 2014 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.

          आपला देश वॉशिंग्टन अ‍ॅकॉर्डवर पूर्ण स्वाक्षरी करणारा असल्याने, या यशामुळे विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोच्च उद्योगांमध्ये तसेच वॉशिंग्टन अ‍ॅकॉर्डच्या इतर सदस्य देशांमध्ये रोजगार मिळवून देण्यास तसेच उच्च अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

          नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशन द्वारे मान्यताप्राप्तीचा उद्देश महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर स्तरांवर, मान्यताद्वारे तांत्रिक शिक्षणातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आहे. NBA मान्यता प्रक्रियेद्वारे प्रदान केलेल्या गुणवत्तेच्या बाह्य पडताळणीचा सर्वच संस्था, विद्यार्थी, नियोक्ते आणि सामान्य जनतेला फायदा होतो. तांत्रिक शिक्षणातील उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी NBA च्या विकासात्मक दृष्टीकोनाद्वारे प्रोत्साहित केलेल्या निरंतर गुणवत्ता सुधारण्याच्या प्रक्रियेचा देखील त्यांना फायदा होतो.

         नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशन हे तांत्रिक संस्थांच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन विविध निकष आणि मापदंडांवर आधारित मूल्यांकन करते. यामध्ये संस्थात्मक दृष्टी, ध्येय आणि उद्दिष्टे, संस्था आणि प्रशासन, पायाभूत सुविधा, अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रमाची रचना आणि पुनरावलोकन, विद्यार्थ्यांची कामगिरी, शिक्षकांची कामगिरी, इतर सहाय्य सेवा जसे- ग्रंथालाय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक सुविधा इत्यादिंचा समावेश होतो. ज्यामुळे उद्योगाच्या गरजेनुसार संस्थांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांना मदत होते .

         नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडिटेशनने Outcome Based Education आधारित शिक्षण मॉडेल स्वीकारले आहे, त्याची कार्यपद्धती आंतरराष्ट्रीय मानका नुसार संरेखित केली. आउटकम बेस एजुकेशन हे कार्यक्रमाच्या शेवटी इष्ट परिणाम (ज्ञान, कौशल्य, वृत्ती आणि वर्तनाच्या दृष्टीने) साध्य करण्यासाठी लक्ष्य केले जाते. या जाणीवेने शिकवणे आणि संबंधित प्रयत्न करणे हे आउटकम बेस एजुकेशनचे उदिष्ट्य आहे. यामध्ये आउटकम बेस एजुकेशनची कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी एक नियमित पद्धत समाविष्ट आहे.

        संस्थेतर्फे राबविले जाणाऱ्या अभ्यासक्रमांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेतर्फे ठोस प्रयत्न केले जात होते. शैक्षणिक गुणवत्तेची उच्च पातळी राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी नियमित शैक्षणिक अंकेक्षण (Audit) केले जाते. शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया ही पदविका श्रेणीमध्ये कामगिरी करणाऱ्या देशातील मोजक्या संस्थांपैकी एक आहे.

        संस्थेने तंत्रशिक्षण संचालनालयाचे (DTE) संचालक डॉ.अभय वाघ, डॉ.विनोद मोहितकर, संचालक MSBTE, मुंबई आणि डॉ. एम.बी.डायगव्हाणे सहसंचालक, DTE, RO, नागपूर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथील प्राध्यापक व कर्मचारी यांनी NBA गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती यावेळी देण्यात आली.