जखमी पोलीस कर्मचाऱ्याला म्हणे कुत्रा पिसाळलाय सिद्ध करा,अन्ं सुट्टी मिळवा!

0
31

गोंदिया,दि.10ः येथील पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गंत रामनगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्याने तो जखमी झाला. चावलेला कुत्रा हा पिसाळलेला आहे, हे सुट्टी घेण्याआधी सिद्ध करण्याचे फरमान पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधीक्षकाने पत्राव्दारे दिल्याचा विचित्र प्रकार नुकताच पहायला मिळाला आहे.पोलीस कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्यानंतर त्यांनी उपचारासाठी सुट्टी हवी म्हणून अर्ज केला. तसेच उपचारही घेतले. त्यानंतर जखमा भरल्यानंतर कर्तव्यावर रुजूही झाला. आता तब्बल दोन महिन्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला वरील पत्र मिळाल्याने आता दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यासमोर पडला आहे. मात्र सोशल मीडियावर हा पत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांबद्दल गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे आधी सिद्ध करा आणि नंतरच उपचारासाठीची देय रजा टाका, असा फतवा चक्क पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिक्षकाने एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी काढला आहे. आता देय रजा मंजूर करण्यासाठी चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे सिद्ध करण्याची पंचाईत त्या पीडित कर्मचाऱ्यावर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुटीच्या संदर्भाने नुकतेच तसे पत्र दिले आहे. त्या पत्राची प्रत सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

गोंदिया पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावला. गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. परिणामी या पोलिसाने विशेष रजेसाठी अर्ज केला.एकीकडे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र पोलिसांना आपल्या हक्कासाठी हेच कागदी घोडे त्यांनाच त्रासदायक ठरत असल्याचे या प्रकारातून दिसत आहे. त्यामुळे गोंदियात घडलेल्या या प्रकारावर चर्चा होऊन मार्ग निघणे गरजेचे आहे.

त्यामुळे आपली रजा मंजूर कशी होणार, ही बिकट समस्या त्या कर्मचार्यासमोर निर्माण झाली आहे. तर दूसरीकडे हे विचित्र पत्र व्हायरल झाल्याने पोलिस बॉइज संघटना आक्रमक झाली असून पोलिस कर्मचारी २४ तास आपली ड्यूटी बजावत असताना सतत ते ताण तणावात जगत असतात. ड्यूटी वर असताना एखद्या वेळी त्यांना उपचाराची गरज पडली तर आपली हक्काची सुट्टी मिळविण्यासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागत असेल तर हे चुकीचे असल्याचा आरोप होत आहे.

त्याच्या अर्जाला जिल्हा पोलिस कार्यालय अधीक्षकांनी काहीसे असे उत्तर दिले. कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला पिसाळलेल्या कुत्र्याने दंश घेतला असेल, तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय (मंजूर) आहे. मात्र, तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. म्हणून आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र पिसाळलेला कुत्रा चावल्याचे सोबत जोडलेले नाही, असे म्हणत अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत केला आहे.