आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला प्रथम विजेतेपद

0
10

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी: असोसिएयशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने आयोजित केलेल्या पाचव्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. १६ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शारदा विद्यापीठ, नोएडा, नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा एक भाग म्हणून कव्वालीच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन आणि या कव्वालीच्या विविध प्रकारांना टिकवून ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

यावर्षी आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत एकूण ११ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पंजाब येथील विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या चमूमध्ये केळकर महाविद्यालय देवगड, एम.डी. महाविद्यालय, पोतदार महाविद्यालय, पिल्लई महाविद्यालय आणि गोयनंका महाविद्यायालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उर्दू आणि हिंदी भाषेतील पारंपारिक आणि देशभक्तीपर कव्वालीच्या उत्कृष्ट सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी उपस्थित श्रोते आणि परीक्षकांची मने जिंकली. या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के, प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांनी विजेत्या चमूंचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी साहिल जोशी आणि मैत्रेय जोशी यांचे या कव्वाली स्पर्धेसाठी महत्वाचे योगदान लाभले.