कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
10

कॉपीमुक्त परीक्षेसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर

      गोंदिया, दि.१८ : जिल्ह्यात २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ पासुन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) व ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी.) सुरु होत आहेत. गोंदिया जिल्हयात इ.१२ वी करीता ७४ केंद्रावर १९ हजार ३६३ परीक्षार्थी संख्या असून इ. १० वी ला १०० केंद्रावर १८ हजार २२४ परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १० वी ) परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी शिक्षण विभागाला केल्या.

        जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील सर्व केंद्रसंचालक यांची ऑनलाईन बैठक १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. सदर बैठकीवेळी जिल्हाधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. परीक्षा कालावधीत कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत सर्व संबंधितांना अवगत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. कॉपी मुक्त अभियान यशस्वी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

परीक्षा कालावधीत हे करावे

१) परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे.

२) परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र, ओळखपत्र व आवश्यक लेखन साहित्य न चुकता जवळ बाळगावे.

३) परीक्षार्थी यांनी परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक काळजीपूर्वक पहावे.

४) उत्तरपुस्तिकेतील सर्व मार्गदर्शक सूचनांचे समजपूर्वक वाचन करावे.

५) परीक्षेशी संबंधित नसणारे अनावश्यक साहित्य जवळ बाळगणे कटाक्षाने टाळावे.

६) सर्व पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांचे मोबाईल केंद्र चालक यांनी स्वतःच्या कस्टडीत जमा करुन सिलबंद ठेवावेत.

७) परीक्षा कक्षात प्रवेश देण्यापूर्वी महिला कर्मचारी यांच्या मदतीने मुलींची स्वतंत्र खोलीत झडती / तपासणी करावी.

८) परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी केंद्रसंचालक यांनी वैयक्तिकरित्या पोलीस विभागाशी संपर्क करावा. तसेच पोलीस विभागाच्या महत्वाच्या अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याकडे उपलब्ध करुन घ्यावेत.

९) आपल्या परिसरातील आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी यांचेही भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याकडे उपलब्ध करुन घ्यावेत.

१०) परीक्षा सुरु असतांना गैरहजर विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिका व शिल्लक प्रश्नपत्रिका पेपर संपेपर्यंत सिलबंद कपाटात ठेवाव्यात.

११) परीक्षा केंद्रावरील उपलब्ध सुविधांबाबत (स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था इ.) दिशादर्शक चिन्हासह मार्गदर्शक सूचना दर्शनी भागात लिहाव्यात.

१२) परीक्षा केंद्रावर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी परीक्षा विषयक कामकाजाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने ओळखपत्र वापरावेत.

१३) केंद्रसंचालक यांनी सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असेल तर ती यंत्रणा कार्यरत असून चित्रिकरणाची साठवणूक होत असल्याबाबतची खातरजमा करावी.

१४) ज्या परीक्षा केंद्रावर दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट होत असतील त्यांना शासन निर्णयानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन

दिल्याबाबतची केंद्र संचालक यांनी खात्री करावी.

परीक्षा कालावधीत हे करु नये

१) परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व सहाय्यक परिरक्षक यांच्याशिवाय इतर कोणीही मोबाईलचा वापर करणार नाही.

२) परीक्षेच्या कामकाजाशी संबंधित नसणारी कोणतेही व्यक्ती परीक्षा केंद्राच्या परिसरात उपस्थित राहणार नाही.

३) प्रत्येक परीक्षार्थींची तपासणी करतांना परीक्षेसाठी प्रतिबंधीत केलेले कोणतेही साहित्य बाळगले जाणार नाही याची दक्षता

घ्यावी. विशेषतः स्मॉर्टवाच, मोबाईल, ब्ल्यूटूथ, कॅलक्युलेटर इ. ईलेक्ट्रॉनिक साहित्य आणता येणार नाही.

४) ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचे शिक्षक परीक्षा केंद्राच्या परिसरात उपस्थित असणार नाहीत.

५) पेपर संपण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात परीक्षार्थ्यांना परीक्षा कक्षाच्या बाहेर जाता येणार नाही.

६) मंडळाने निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परीक्षार्थीला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

७) कुठल्याही परीक्षार्थीला प्रश्न पुस्तिकेवर परीक्षा क्रमांक शिवाय अन्य काहीही लिहता येणार नाही.

८) बैठे पथकातील सदस्यांनी परस्पर विद्यार्थ्यांना अथवा पर्यवेक्षकांना कोणत्याही सूचना देवू नयेत.

९) कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास अथवा परीक्षा संचालनास अडथळा निर्माण होईल अशी कृती बैठे पथकाकडून होवू नये. वरील मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आदेश शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी निर्गमित केले आहेत.