12 ला राज्यातील सर्व शाळा बंद

0
20

गोंदिया – राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणारा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी 12 ला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने घेतला आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणाऱ्या शासन निर्णयाविरोधात कर्मचारी संघटनांची संयुक्त आघाडी आणि राज्य शिक्षण हक्क कृती समिती यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 12 ला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा समाप्त केलेल्या प्रोबेशनरी शिक्षकांना (शिक्षणसेवकांना) त्वरित कामावर घ्यावे. कला-क्रीडा विशेष शिक्षकांचा दर्जा पूर्ववत पूर्णवेळ करावा, 10 टक्के वेतनेत्तर अनुदान त्वरित द्यावे आणि सर्व विनाअनुदानित शाळांना विनाविलंब अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आरटीइ कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्‍चिती करण्याबाबत राज्यातील असमान भौगोलिक स्थिती, रोस्टर आणि विषयांची आवश्‍यकता याबाबत विद्यार्थ्यांचा अधिकार लक्षात घेऊन नव्याने धोरण आखावे. तोपर्यंत एमइपीएस 1981 मधील तरतुदीप्रमाणे 2012-13 या शैक्षणिक वर्षात मंजूर केलेली पायाभूत पदे कायम ठेवावीत. कोणत्याही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रोबेशनरी शिक्षकांना अतिरिक्त करू नये. त्यांचा पगार ऑफलाइन न करता ऑनलाइनने करावा, अशा विविध मागण्यांसाठी 12 ला सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.