तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल करणार -चौधरी

0
9

गोरेगाव : आज तंत्रज्ञानाचे वाढते महत्व बघता राज्यात शैक्षणिक बदल दिसून येत आहे. प्रगत शैक्षणिक राज्य म्हणून तंत्रज्ञानाला पहिल्या वर्गापासून जिल्हा परिषदेच्या शाळांपासून सुरुवात करण्यात आली. यात लोकसहभागाला विशेष स्थान देण्यात आले. शासनाचा कुठलाही आर्थिक सहभाग नसताना अनेक शाळा डिजीटल झाल्याने त्याचा शैक्षणिक फायदा बघता तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजीटल करणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कुर्‍हाडी येथील डिजीटल शाळेच्या उद््घाटन प्रसंगी शुक्रवारी (दि.८) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांच्या हस्ते या शाळेचे उद््घाटन करण्यात आले.विशेष मार्गदर्शक म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जेष्ठ अधिव्याख्याता राजेश रुद्रकार तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य केवलराम बघेले, सरपंच संजय आमदे, उपसरपंच सुनील लांजेवार, पोलीस पाटील हेमराज सोनवाने, तंटामुक्त समिती अध्यक्ष डी.एम. राऊत, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, आर.एल. मांढरे, दीनदयाल कटरे, विमल येरणे उपस्थित होते.
शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी, शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यासाठी राजकारण्यांनी श्रेय घेण्याचा भान बाजूला सारुन काम केल्यास जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल होऊन येणारी भावी पिढी तंत्रज्ञान समृद्ध पिढी निर्माण होईल. शिक्षण क्षेत्रासाठी मोठा निधी मिळवून प्रत्येक शाळा ‘समृद्ध शाळा- प्रगत शाळा’ निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापक बोपचे यांनी शाळेची माहिती दिली. ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामवासीयांनी शाळा डिजीटल करण्यासाठी भरीव मदत करुन शाळेला ८0 हजार रुपयांची मदत केली व सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख एच.एम. शहारे यांच्या मार्गदर्शनात शाळेला प्रगत डिजीटल शाळा करण्यासाठी शाळेची रंगरंगोटी, शौचालय दुरुस्ती व प्रोजेक्टर खरेदी करुन एलसीडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी आनंददायी शिक्षण देण्याची हमी दिली.