मुरकुटडोह दंडारीची शाळा तीन वर्षांपासून बंद

0
14
गोंदिया- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या अतीदुर्गम नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे मुरकुटडोह  दंडारी येथील शाळा बंद पडल्याने गावातील विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील खासगी व शासकीय आश्रमशाळेत पाठविण्याची वेळ पालकांवर आली आहे.ये-जा करायला साधन नसतानाही त्याठिकाणी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळेची इमारत उभारली गेली.सुरवातीला त्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाकंडून अभ्यासाचे धडेही मिळाले.मात्र काही दिवसानीच त्या शाळेत शिकवायला नियुक्त शिक्षकही नक्षल्यांच्या भितीने माघार घेऊ लागल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे हळूहळू बंद होऊ लागली.त्यानंतर पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षकच येत नसल्याचे बघत दरेकसा,सालेकसा  व पिपरीया य़ेथील आश्रमशाळामध्ये मुलांना पाठवायला सुरवात केली.त्यानंतर कमी पटसंख्येचे कारण करुन त्या शाळा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी घेतल्याचे समोर आले आहे.तेव्हापासून या शाळा म्हणजे 3-4 वर्षापासून बंद पडल्या आहेत.
 मागील तीन वर्षांपासून शाळा बंद असल्याने गावातील मुले शासकीय व खासगी आश्रमशाळेत निवासी आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या इमारती असल्या तरी ओसाड आहेत. मुरकुटडोह क्र.१ येथील शाळेची दुरावस्था झाली आहे तर मुरकुटडोह क्र.2 मध्ये तर कंत्राटदाराने साहित्य ठेवले आहेत. दंडारीची शाळेची इमारत बंद आहे. आधी शिक्षक जात नसल्याने मुलांनी आश्रमशाळेची वाट धरली.माओवाद्याच्या भीतीने या ठिकाणी शिक्षकच शाळेत जायला घाबरत आहेत.सध्याची परिस्थिती ही आधीपेक्षाही चांगली असून ये जा करण्यासाठी चांगला रस्ता आणि सुरक्षेकरीता पोलिसांचे बेस कॅम्प त्याठिकाणी असल्याने त्याठिकाणच्या शाळा सुरु झाल्यास आमच्या मुलांना इतरत्र पाठवण्याची गरज पडणार नसल्याचे टेकाटोला निवासी पैकुलाल पंधरे,मुरकुटडोहचे कमल इनवाते आदींनी आपल्या भावना व्यक्त केले.तर किमान एका गावात शाळा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करीत असल्याचे झुमक टेकाम यांनी सांगितले.यापुर्वी जिल्हाधिकारी व आमदारही येऊन शाळा सुरु करण्याचे आश्वासन देऊन गेले मात्र आजपर्यंत याठिकाणी शाळा सुरु न होता बंद पडल्याने इमारतीही आपल्यावर अश्रू ढाळत बसल्या आहेत.
शाळा सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु-गटशिक्षणाधिकारी- विशाल डोंगरे
मुरकुटडोह दंडारी येथील शाळा तीनचार वर्षापासून बंद असून त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्तीही सध्या केलेली नाही.कमी पटसंख्येच्या कारणावरुन त्या शाळा त्यावेळी बंद करण्यात आल्या होत्या.मात्र सध्या पालकांची मागणी येत असल्याने त्याठिकाणी पालकांचे हमीपत्र घेऊन शाळा सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत.