राज्यातील बीएस्सी नर्सिंग कॉलेज सलाइनवर!

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर – राज्यात शासनाचे केवळ चार बीएस्सी नर्सिंग कॉलेज आहेत. परंतु, आठ वर्षांपासून शैक्षणिक व तांत्रिक पदांच्या निर्मितीच्या अभावाने चारही बीएस्सी नर्सिंग कॉलेज सलाइनवर आले. वैद्यकीय संचालकांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केल्यामुळे पुढील सहा महिने बीएस्सी नर्सिंग कॉलेज सुरू असतील. एप्रिलमध्ये नव्याने पदनिर्मितीचा दुसरा अध्यादेश काढला; परंतु सरकारकडून अंमलबजावणी न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. मुंबईतील जेजे, औरंगाबादेतील घाटी, पुण्यातील बीजे आणि नागपुरात मेडिकलमध्ये बीएस्सी नर्सिंग कॉलेज 2006 पासून सुरू आहेत. परंतु, वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बीएस्सी नर्सिंग कॉलेजना अवकळा आली आहे.

भारतीय नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या मानकाप्रमाणे बीएस्सी कॉलेजमध्ये शैक्षणिक व शिक्षकेतर पदांचा भरणा करण्यात आला नाही. वास्तविक बीएस्सी नर्सिंग कॉलेज सुरू होण्यापूर्वीच पदनिर्मिती करण्यासाठी शासनाने 25 नोव्हेंबर 2005 मध्ये अध्यादेश काढला; परंतु आठ वर्षांनंतरही अंमलबजावणी झाली नाही. यामुळे महाराष्ट्र विज्ञान आरोग्य विद्यापीठाने प्रवेश थांबवले. परिणामी 21 एप्रिल 2014 ला पुन्हा शासनाने अध्यादेश काढून पदनिर्मिती केली जाईल, असे शपथपत्र न्यायालयात दिले. राज्यातील चारही बीएस्सी नर्सिंग महाविद्यालये “ट्यूटर‘च्या भरवशावर आहेत. वेतन ट्यूटरचे मिळत असले, तरी सारे ट्यूटर कागदोपत्री कुणी प्राचार्य बनले, कुणी उपप्राचार्य तर कुणी सहयोगी प्राध्यापक. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या मानकाप्रमाणे पात्र असताना पदोन्नतीपासून सारे शिक्षक वंचित आहेत. बीएस्सी नर्सिंगचे अस्तित्व धोक्‍यात आणण्याचे काम वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या शुश्रुषा अधीक्षिका (वैद्यकीय संचालनालय), नर्सिंग विभागातील उपसचिव, वैद्यकीय संचालक यांनीच केले. बीएस्सी नर्सिंगचा जीव वाचविण्यासाठी 14 स्मरणपत्रे पाठविण्यात आली; परंतु केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळेच बीएस्सी नर्सिंग कॉलेज अखेरच्या घटका मोजत आहेत.