राज्यपाल उद्या यवतमाळ जिल्ह्यात

0
10

यवतमाळ -आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी (ता. १०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. झरी जामणी तालुक्यातील पांढरवाणीजवळील हेलिपॅडवर सकाळी त्यांचे आगमण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दुभाटी पोड येथील शाळेला ते भेट देतील. विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी चर्चा करणार. शिबला व गोपाळपूर आदिवासी आश्रमशाळांनी भेट दिल्यानंतर वनहक्क, पेसा कायद्याची अंमलबजावणी यासह आरोग्य, शिक्षण याबाबत ते माहिती जाणून घेतील. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत सरकारने द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी राज्यपालांना निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती आहे. झरीचा भाग तेलंगणच्या सीमेवर असल्याने येथील सर्वसामान्यांना तेलुगु भाषा चांगल्या प्रकारे येते. राज्यपालांनाही ही भाषा अवगत असल्याने अनेकांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.