
MA च्या अभ्यासक्रमातील काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाला कात्री
नागपूर,दि.29- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात भाजप, जनसंघ व राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास शिकवला जाणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांच्या इतिहासाला कात्री लावली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने इतिहासाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यात भाजपचा समावेश करण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती 1948 ते 2010 अशी करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या विषयाला कात्री
अभ्यासक्रमातील राष्ट्रीय राजकीय पक्ष नामक प्रकरणातील काँग्रेसच्या इतिहासात काटछाट करून त्याजागी जनसंघ व भाजपची स्थापना, त्यांचे कार्य, विस्तार, विचारधारा व त्यांची राष्ट्रीय भूमिका आदींची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम 2023-24 शैक्षणिक वर्षांपासून लागू होणार आहे.
2019 मध्येही झाला होता बदल
विद्यापीठाने यापूर्वी 2019 मध्ये बी.ए.च्या अभ्यासक्रमात बदल केला होता. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान या प्रकरणाचा समावेश करण्यासाठी नेचर ऑफ मोडरेट पॉलिटिक्स आणि राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनॅलिझम या 2 विषयांचा इतिहास वगळण्यात आला होता. तेव्हा विविध संघटनांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता.
त्यानंतर आता भारतीय स्वातंत्र्य लढय़ात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या काँग्रेसच्या इतिहासाला कात्री लावून भाजपचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे हे विद्यापीठ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
प्रादेशिक पक्षही हद्दपार
देशाच्या राजकारणात काही प्रमुख प्रादेशिक पक्षांचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास नव्या पिढीला शिकवण्याची गरज असते. पण आता त्यांचा उल्लेखच अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. यासाठी साम्यवादी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष राहिला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
राम जन्मभूमी ‘इन’, खलिस्तान चळवळ ‘आऊट’
इतिहासाच्या अभ्यासक्रमात 1980 ते 2000 या कालावधीतील आंदोलनांत जनांदोलन म्हणून आता रामजन्मभूमीचे आंदोलन शिकवले जाणार आहे. यासाठी खलिस्तानी चळवळीचा इतिहास वगळण्यात आला आहे.
विद्यापीठाने केले बदलाचे समर्थन
विद्यापीठ प्रशासनाने नव्या बदलांचे जोरदार समर्थन केले आहे. ‘नवा अभ्यासक्रम 1948 ते 2010 पर्यंत आहे. त्यामुळे त्यात जनसंघ व त्यानंतर भाजपचा इतिहास टाकण्यात आला. या प्रकरणी काँग्रेसला वगळण्यात आले नाही. पण कम्युनिस्ट पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नसल्यामुळे त्याला प्रकरणातून वगळले. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधींची भूमिका या प्रकरणांचा यात समावेश करण्यात आला आहे,’ असे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्याम कोरेठी यांनी या प्रकरणी म्हटले आहे.
वडेट्टीवारांची टीकेची झोड
दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी टीकेची झोड उठवली आहे. ‘भाजप शासकीय संस्थांचा वापर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसलेल्या पक्षांचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करणे चुकीचे आहे. अभ्यासक्रमात बदल करून काँग्रेसचा इतिहास व योगदान पुसता येणार नाही,’ असे ते म्हणालेत.