जे. एम. हायस्कूल येथे काॅम्प्यूटर लॅबचे उद्घाटन
गोंदिया ः सिव्हील लाइन, गोंदिया येथील जे. एम. हायस्कूल येथे नुकतीच काॅम्प्यूटर लॅबची स्थापना करण्यात आली. या लॅबचे उद्घाटन अभियंता पराग लिचडे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पटले, नागपुरे, राखडे, शिक्षिका लांजेवार उपस्थित होते.
पराग लिचडे हे जे. एम. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. ते ब्रिलिआे टेक्नालाॅजी या कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कंपनीअंतर्गत असलेल्या ब्रिलिआे ब्रिंगींग स्माइल्समार्फत कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी ज्या शासकीय अनुदानित शाळेत शिकले, त्या शाळेला संगणक भेट देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार, पराग लिचडे यांनी जे.एम. हायस्कूल येथे संगणकाची गरज आेळखून या शाळेचे नाव कंपनीकडे दिले होते. त्यानुसार, शाळेला दहा संगणक भेट देण्यात आले. तथापि, या काॅम्प्यूटर लॅबचे उद्घाटन माजी विद्यार्थी असलेले अभियंता पराग लिचडे यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकीय ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. ही गरज आेळखून पराग लिचडे या विद्यार्थ्याने कार्यरत असलेल्या कंपनीमार्फत शाळेला संगणक भेट दिले. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी त्यांच्यावर काैतुकाची थाप दिली. संचालन नीरज नागपुरे यांनी केले. आभार मुख्याध्यापक अग्रवाल यांनी मानले.