अर्जुनीचा किशोर काळबांधे जिल्ह्यात प्रथम

0
33

गोंदिया : / उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ८६.५२ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा किशोर काळबांधे याने जिल्ह्यात सर्वाधिक ९३.६९ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच गुणानुक्रमे दुसरे व तिसरे स्थान गोंदिया एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित डी.बी. सायन्स कॉलेजचे विद्यार्थी भाग्यश्री बिसेन (९३.५४ टक्के) आणि आकाश कोतवाल (९२.९२ टक्के) यांनी पटकावले.

 बारावी विज्ञान शाखेतून सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी किशोर ओंकार काळबांधे याने गरीब परिस्थितीतून यश मिळवत जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले आहे. त्याला पुढे संगणक अथवा केमिकल इंजिनिअर व्हायचं आहे.d990828-largeतीन किमी अंतरावरील ताडगाव येथून किशोर सायकलने शाळेत येत होता. त्याचे वडील मिळेल त्या ठिकाणी इलेक्ट्रीक फिटींगची खासगी कामे करतात. आई गृहिणी आहे. निकाल कळताच अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी त्याच्या घरी येणाऱ्यांची रेलचेल सुरू होती. मात्र आईला मुलाच्या यशाची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्या दिवसभर रोजगार हमीच्या कामावर होत्या. त्याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. सहावीपासून तो सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दहावीत त्याने ९३.६० टक्के गुण मिळविले होते. शिकवणी वर्ग नसताना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून त्याने सुयश संपादन केले. शाळेतील शिस्त, संस्कार, शिक्षण व मार्गदर्शनाचे हे फलित आहे. कठोर मेहनत, जिद्द हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांने अंगिकारावे असे तो म्हणाला.