भूमेश्वरी गहाणे ९२.३० टक्के घेऊन भंडारा जिल्ह्यात प्रथम

0
9

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के इतका लागला. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भूमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के (६०० गुण) घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. यावर्षीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार यांनी ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर हिला ९१.६५ टक्के (५९६ गुण) घेऊन तृतीय आली आहे.

बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३१ इतकी असून मुलांची टक्केवारी ८५.८६ इतकी आहे. जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सरगम चंद्रकांत ठाकरे हिला ९१.५३ टक्के, नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या रमेश गहेरवार हिला ९०.९२ टक्के (५९१ गुण) प्राप्त केले.